मी झक् मारतो -

          "अहो, ऐकलं का ?"  या वाक्यापाठोपाठ माझ्या तोंडावरील पांघरूण हळुवारपणे निघाले.
पण गेली कित्येक वर्षे इतक्या मंजूळ आवाजाची लकेर "पुन्हा प्रपंच"मधील मीना वहिनींच्या मुखकमलाखेरीज अन्यत्र कोठेही आढळणार नाही, याची खात्री पटल्याने मी डोळे न उघडताच चादर पुन्हा तोंडावर ओढली.
   
     "अहो अस काय करताय !" या "खास" आवाजापाठोपाठ ती चादर खसकन ओढली गेली. आता मात्र मी भासातून वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केलं नाही. डोळे उघडून त्रासिकपणे समोर पाहिले अन अपेक्षेप्रमाणे सौ.च्या रुपात जगदंबा उभी !

     "उठा,  उठा नवरोजी ! आजपासून तुम्ही लेखक झाला आहात. "साप्ताहिक रसातळ"मधे तुमची कथा छापून आलीय !" तिने सांगताच मी "साप्ताहिक" ओढले अन पलंगावर टाकले, त्याबरोबर तीही नेमकी माझ्या पुढ्यातच आली ! माझे डोळे अधाशासारखे तिच्यावर [ह्या ह्या ह्या..! तुमचा अंदाज चुकला बर का ! तिच्यावर म्हणजे-  माझ्या छापून आलेल्या गोष्टीवर !] तुटून पडले. मॅटर्निटी होममधील जनरल वॉर्डात अडलेल्या स्त्रीने "सुटले गsss बाई !" म्हणून पोट रिकामे करावे तद्वत मी [नुसताच] "सुटलो बुवा एकदाचा" छाप सुस्कारा टाकला.

     आज माझ्या आयुष्यातला सोनियाचा दिवस उगवला होता ! मी चक्क "लेखक" झालो होतो ! "तुम्हास माहित आहे काय !" या सदरात आजवर शेकडो [चोरलेलीच अर्थात !] टिपणे माझ्या नावावर संग्राहक म्हणून जमा होती. "वेचलेले सुवर्णकण" सदरात हजारो सुभाषिते संग्रा. म्हणून माझ्या नावावर छापून आली होती. तसेच "आमच्या दारासमोरील उघड्या गटारांकडे यूनोचे लक्ष वेधणार तरी कधी ?" याप्रकारची असंख्य जळजळीत व ज्वलंत समस्यांवर आधारितपत्रे "वाचकांची पत्रे" या सदरात मी लिहिली होती !

     परंतु आजची गोडी काही औरच होती. दुसऱ्याचे नाव लेखक म्हणून वाचताना माझ्या अंगावर साळूप्रमाणे काटे खुपत, पण आज एकाच दिवशी बोनस+ ओटी+ सीडीएस+ सौ.चा एक गोड गोड [?] मिळाल्याचे सुखद रोमांच अंगावर जाणवत होते. "लेखक" म्हणून माझे अधिकृत बारसे करणाऱ्या "साप्ताहिक रसातळ"च्या संपादकास मी मनात लाख लाख धन्यवाद दिले व या बारशाचे किलोभर पेढे सौ.ला देण्याचे कबूल केले !

     शेजारचे नाना सर्वात वयस्कर ! म्हटलं आपल्या "अपत्या"ची पहिलीवहिली प्रत त्यांना अर्पण करावी व आशीर्वाद घ्यावा.

     "नाना,  नाना ! मी लेखक झालो !" - असे ओरडत मी त्यांच्या घरात शिरलो तो नानीच समोर ! त्यांनी बहुधा देवपूजा आटोपली असावी. न बोलताच खुणेनं त्यांनी हाताची पाचही बोटं विरळ करून माझ्यासमोर पालथी धरली . तेवढ्यात नाना आलेच. त्यांच्याकडे आपुलकीची एक नजर टाकून मी म्हणालो, "नाना, मी लेखक  झालो !" नाना डोळे मिचकावत उद्गारले- " रद्दीचा भाव नक्कीच वधारणार मग !"  असा राग आला थेरड्याचा  त्या क्षणी ! मनात म्हटलं- "आशीर्वाद गेला गाढवाच्या xxx "!

    " बसा जोशीबुवा, बसा ! म्हणून तुम्ही आयुष्यात भल्या पहाटे सात वाजता उठला तर ?" नानांनी धोतराच्या सोग्याने तोंड पुसत विचारले. "झोप" हा माझा "वीक पॉइंट" तमाम शेजाऱ्यांना आमच्याच "गृहकृत्यदक्ष- लाऊडस्पीकर"ने मागेच जाहीर केला होता हे वेगळे सांगणे न लगे ! मी मुकाट्याने एका खुर्चीवर बसलो.           [-आशाळभूतपणे चहाची अपेक्षा करत ! जातिवंत कारकूनच शेवटी आम्ही !]  हातातल्या साप्ताहिकाचा कागद त्यांच्यासमोर धरला.

     "आमच्या नातवाला "बसायला" आता हक्काचे फुकट कागद मिळणार म्हणा की !"  पुन्हा म्हाताऱ्याचा विनोद ! [पण चहाचा वास छान सुटल्याने-]  मी त्याकडे म्हणजे विनोदाकडे दुर्लक्ष केले.

     "आणि बर का जोशीबुवा ! कालच आमच्या पिंकीनं चष्म्याची काच फोडली हो ! मी कसा वाचणार आता ? " खो खो करत त्या बिलंदराने कागद माझ्या हातात [साभार परतीचे विशेष दु:ख न होता-] कोंबला.

     चहाचा घोट घेत "तू वाचूच नकोस- लवकर मर बेट्या" असा आशीर्वाद [अर्थात मनातच!] मीच त्याला देऊन काढता पाय घेतला !

     माझ्या घरात शिरणार तो आत "ही" गर्दी जमलेली ! "काय झालं" म्हणून मी आत घुसू लागलो. पंतप्रधानाची गाडी दुरून दिसताच- " आले ! आले  !" असा गलका जनतेने करावा, तशा आरोळ्या घरभर पसरल्या. ही किमया बहुधा माझ्या कथेची असणार असा संशय मला आला.

     "जोशीकाकू खरंच भाग्यवान आहेत हं !" एका किरट्या आवाजाचा साक्षात्कार झाला.

    " जोशीबाई ! आता "उपहार"मधे पार्टी हवी हं !"  हा वखवखलेल्या अर्धपोटी "बॉबी"चा [वय वर्षे फक्त- तीस ! डोळे- तिरळे ! माप न काढलेलेच बरे !] गजर .

     "पण जोशीबुवा असे असतील असं वाटलं नव्हतं बाई !" एक कौतुकाचा [असं मला उगाच वाटलं खरं !] स्वर निनादला.

     "तायडे ! आता तुला गृहपाठाचे निबंध लिहायला रोज मदत करतील हं आपले जोशीकाका ! - ज्या कमलताईंनी शेजारणीला कोथिंबीरीच्या काडीइतकी मदत केली नाही, त्याच कमलताईंचा इतका मधाळ स्वर !

     असे स्तुतीसुमनांचे वर्षाव उधळत, एकेक चहाचा कप ढोसून महिला-वर्गाचे लोंढे आमच्या घरातून परतले. खरं सांगू का - माझ्यातल्या लेखकाला "बॉबी"चे  तिरळे डोळे ड्रीमगर्ल हेमाच्या टप्पोऱ्या डोळ्यांपेक्षाही कितीतरी आकर्षक वाटले त्यावेळी ! दोन जीव असते माझे- तर तिच्या  दोन्ही डोळ्यांवरून ओवाळून टाकले असते ! पण माझा एकच जीव असल्याने आणि तोहि सौ.कडे आधी गहाण पडल्याने अगदीच नाइलाज झाला !

     एक दिवस सकाळीच शेजारच्या विमलाबाई आल्या. सौ. आतल्या घरात भाजी चिरते आहे असे पाहून मला म्हणाल्या- "जोशी भावजी ! माझ किनई एक छोटसंच काम आहे. विमलाबाई ऊर्फ "किनईबाई"मुळे मला एकदम गहिवरून आलं. "वहिनी,  मी कुणी परका का आहे ? शेजाऱ्यावर प्रेम करा- हे आपल्या रामायणानेच नाही का शिकवलं ! अगदी निस्संकोचपणे सांगा काय काम असेल ते ! माझ्यातल्या लेखकाचा आदबशीर पैलू उलगडला. एरव्ही मी आणि सौ. या बाईच्या "किनई"ला मनसोक्त हसत असू !

      "म्हणजे आमच्या ह्यांचं किनई हे अगदीच बारीक आहे-  आणि किनई खूपच गिचमीड आहे !"

      "आँ..!"  मला  काहीच अर्थबोध न झाल्याने मी किंचाळलो.

     "नाही म्हणजे किनई- ह्यांचं बारीक बारीक आणि गिचमीड अक्षर वाचायला भारीच अवघड आहे."

     "हुश्श्य ! किनईबाईला नकळत मी माझा जीव भांड्यात पाडला.

     "अहो- दर महिन्याला किनई त्या मेल्या वाण्याला चार-चारदा सामानाची यादी वाचून दाखवावी लागते
मला !" -अंगावर स्कायलाब कोसळल्याच्या आविर्भावात विमलाबाई सांगू लागल्या- "तुम्ही किनई आता मोठ्ठे लेखक झाला- म्हणून एक रिक्वेस्ट हो- आमची दर महिन्याच्या सामानाची यादी तुम्ही छानपैकी लिहून द्या !"

     "हेचि फल काय मम लेखनाला !" असे म्हणत, बेशुद्ध पडायचाच काय तो मी शिल्लक राहिलो होतो ! माझ्या सुरेख, वळणदार अक्षराचा असाही शेजाऱ्याला उपयोग होऊ शकेल-  हे ब्रह्मदेवाच्या बापाला स्वप्नात तरी वाटलं असेल काय !

     नंतरचा प्रसंग "बॉस" भेटीचा ! आनंदाच्या भरात मी बॉसच्या केबिनमध्ये शिरलो. शिऱ्यामधे एखादे झुरळ निघावे, अशा आविर्भावात बॉसने मला पाहिले.  म्हटलं- जाऊ द्या, अक्कलवंताला गरज असते ना !

     "सर,  आपण माझी साप्ताहिक---" माझे वाक्य अर्धवट तोडत, बॉस [डुक्कर साला ! अर्थात- मनातच हं !] गुरगुरला-  "साप्ताहिक नाही आणि मासिक नाही, इयरएंड जवळ आली आहे आणि तुम्हाला लीव्हवर जायचं सुचतय ?"

     "तसं नाही सर- 'साप्ताहिक रसातळ'मधे माझी एक गोष्ट छापून आलीय, ती तुम्ही वाचली काय- असं विचारायला मी आलो होतो." एवढं वाक्य मी उच्चारीपर्यंत, डेक्कन क्वीन पुण्याला बॉम्बेहून पोचण्याइतका वेळ गेला.

     "वॉट नॉनसेन्स ! ऑफिसच्या कामाच्या वेळेतच तुम्ही गोष्टी लिहायला शिकला वाटतं ! स्टॉप धिस ! आणि लक्षात ठेवा- मी "टाइम्स ऑफ एक्स्प्रेस"शिवाय काहीच वाचत नसतो. यू कॅन गो !" बॉसने मान खाली घातली. त्याचा गुबगुबीत गळा आणि माझी हडकुळी बोटं यांचं व्यस्त प्रमाण पाहून मी निमूटपणे मनातला मोह आवरला. [-आणि 'साप्ताहिक रसातळ'चा भविष्यकालीन एक अंक एका लेखकाच्या 'फाशी- विशेषांका'ला मुकला !]

     "---- ए जोश्या, थांब लेका !" मी मागे वळून पाहिले.  जुना कॉलेजमित्र "दाते" होता !
     "आयला, साल्या लेखक झाला म्हणजे काय- आभाळातून चालायला शिकलास वाटतं ! आत्ता तुझ्या घरूनच आलो बघ. म्हटलं तेवढाच कांदा-पोह्यांचा चान्स !"

     "दात्या- तुझी प्रेमळ भाषा अजून बंद पाडणारी भेटली नाही का ?" - मी विचारले.

     "भेटेल, यार लवकरच भेटेल ! पण गोष्टी कधीपासून लिहायला लागला साल्या ? अं , आपल्या कॉलेज-मैत्रिणीना कळवलीस ना लेखक झाल्याची बातमी ?"

     "अरे, तुला समजली म्हणजे ती इतरांना समजल्यावाचून थोडीच राहाणाराहे ! म्हणजे बँकेतल्या कॅशिअरने जन्मात नोट न पाहिल्याचे सांगितल्यासारखे विचारतोस मलाच !"

     "जाऊ दे, पण गोष्टीचा मान घे तुला आणि धन माझ्यासाठी खर्च कर थोडे !"

     "वा, चल ना !"

     दातेला हॉटेलमधे नेऊन वडा, भजी, इडली, पेढा खाऊ घातला. दातेनं समाधानानं ढेकर दिली आणि मी तृप्तीनं दहाची नोट काउंटरवाल्याला दिली !

     "जोश्या, लेका ! मलाही माझी कविता पाठवायची रे मासिकाला. प्लीज लिहून दे ना तुझ्या शुभ हस्ताने !" 
- दाते अजीजीने म्हणाला.

     सत्वर दातेला माझ्या घरी नेऊन, कविता 'फेअर' करून पाकिटावर सुवाच्य अक्षरात पत्ता लिहिला आणि 'बेस्ट विशेस' दिल्या.

     नंतर-
     एक दिवस मी 'उपहार'मधे चहाचा घोट घेत असताना,  फॅमिलीरुममधून ओळखीचा- दातेचा आवाज कानावर आला- "बरं का निलू,  त्या येडबंबू जोशीची इतकी फिरकी घेतली मी की बस्स ! 'लेखक' म्हणून त्याला अगदीच हरभऱ्याच्या टोकावर चढवून बसवलं ग ! अग,  त्याने पाकिटावर पत्तासुद्धा लिहून टाकला- मी नको  म्हणत असताना !"

     "एकदम खत्रूड दिसतय तुमच्या लेखक मित्राचं ध्यान !" - निलू नामक तरुणी अस्मादिकांचे माप काढू लागली- "पण त्याच्या अक्षरामुळे संपादक एकदम खूष झाला हं ! मला त्यानं कॉफीतर पाजलीच पण माझ्याइतकंच अक्षरही सुंदर असल्याची शाबासकीही दिली ! म्हणून तर आज मी कवयित्री झाले ना !"

     "डार्लिंग, अग संपादकानं तुझी कविता स्वीकारली आणि मी तुला ! मला चार ओळी निबंधही लिहिता येत नव्हता, हे त्या बावळट जोश्याच्या लक्षातही कसं आलं नाही देव जाणे ! पण एss तुझ्या कवितेचं सर्टिफिकेट मी तुझ्या गालावर...."
     पुढचं बोलणं मी ऐकू शकलो नाही.

     कोणत्या मुहूर्तावर मी लेखक व्हायची झक् मारली, याचा विचार करतोय ! डोन्ट डिस्टर्ब मी !
.

[ "अबब" - दिवाळी अंक १९७९ ]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा