स्वातंत्र्यदिन

स्वैपाकघरातून खणखणीत आवाजात बायकोचा प्रश्न कानावर आदळला-
"अहो, ऐकलंत का ?"

मीही हॉलमधून ओरडूनच दणदणीत आवाजात प्रत्युत्तर देण्यासाठी, 
तोंड उघडणार होतो, पण "काही कारणा"ने तसे करणे अशक्यच होते. 
[ते कारण, सूज्ञ अनुभवी नवरेमंडळीच सहजपणे ओळखू शकतील !]

स्वैपाकघराच्या दारापर्यंत गेलो.
तिचे लाटण्याने कणिक तिंबणे चालू होते.

पुरेशा अंतरावरून उभ्याउभ्याच मी विचारले,
"काय ग, मला काही म्हणालीस काय ?"

बायको दाणकन लाटणे कणकीच्या गोळ्यावर आपटत उत्तरली,
"दुसरे कुणी आहे का आता घरात [-वस्सकन ओरडण्यासारखे ?] !
अहो, आज आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन आहे ना ?"

[मी मनात म्हटले- 'माझा कधी आहे कुणास ठाऊक, 
तुझ्या तावडीतून सुटण्याचा स्वातंत्र्यदिन ?' ]

तिला उत्तरादाखल नंदीबैलासारखी नुसतीच मान हलवली मी !

ती पुढे म्हणाली-
" आज काहीतरी गोड पक्वान्न नको का करायला मग ?"

[मी मनात म्हटले- 'तू नुसते गोड बोललीस तरी, 
मला एखादे पक्वान्न गिळल्याचा आनंद होतो ग माझे आई !']

"मग श्रीखंड जामून जिलेबी लाडू.... 
काय घेऊन येता ?" 
- तिने मला विचारले.

लग्नाच्या बेडीमुळे गेली ४३ वर्षे पारतंत्र्यात अडकून वावरणारा मी---
काय उत्तर देणार होतो हो बापुडा !

मी विचारले- "श्रीखंड जामून जिलेबी लाडू, काहीही आवडते मला. 
यातले तुला काय आवडते ते आणतो !"

त्यावर ती उत्तरली- " आज एवढा स्वातंत्र्यदिनाचा महत्वाचा दिवस. 
बासुंदीच आणावी म्हणते मी !"

देशात सर्वत्र साजरा होणाऱ्या या महत्वाच्या दिनी,
माझ्यातला बिच्चारा नवरा काय उलट बोलणार यावर ?

मुकाट्याने बाहेर पडलो---
माझा सर्वात जास्त नावडता पदार्थ आणायला !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा