सात चारोळ्या -

मोह -
अशीच अमुची "बाई" असती
सुंदर रूपवती 
धुणीभांडी मी केली असती
घुटमळून  भवती !
.

अनिवार्य-
असो हिवाळा वा पावसाळा
तुझी सोबत सखे, अनिवार्य का -
गुलाबी थंडी वा चिंब भिजणे
आठवण होणे अनिवार्य का..
.

जीवनगाणे -
असतेस दु:खी जेव्हा तू
गीत हुंदक्यांचे ऐकतो -
हसतेस जेव्हा जेव्हा तू
मनातून सूरही लावतो ..
.

अपशकून -
अंधश्रद्धा उखडण्यासाठी 
जेव्हां जेव्हां मी तळमळतो
दारासमोर आडवे मांजर 
 मनात का मी कळवळतो !
.

सखीवर सरी -
अंगाखांद्यावर मी तुझ्या 
खूप आता खेळणार आहे -
पावसाच्या सरी होऊन 
खूप तुला छळणार आहे ..
.

महाआळशी -
'असेल माझा हरी' म्हणत 
बसला तसाच खाटल्यावरी -
पडला खाटल्यावरून तरी
अजून हरीवर श्रद्धा धरी ..
.

रुसवा -
असून माझ्याजवळी का 
प्राजक्ताचा रुसवा इकडे - 
हलवत अपुल्या फांदीला 
फेकतो फुले शेजारी तिकडे ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा