जा ना गडे एकदा तरी जेलमधे ...


आज सकाळी सकाळी.....
 बायकोला काय आकाबाई आठवली कोण जाणे -

ती मला म्हणाली-
"अहो, तुम्ही पण जा ना एकदा जेलमधे !"

केवढ्याने किंचाळलो मी ..!
पण ती ढिम्म !

पुढे ती बोलली-
"खरेच , कित्ती मज्जा येईल ना मग ?
मी रोज तुम्हाला तुमच्या आवडीचा डब्बा आणून देईन ;
रोज रोज नवनवीन पदार्थ बनवीन ;

आपल्या घरांत साठलेले...
आणि आपण दोघांनी कधीच न वाचलेले-
हे सगळे जाडजूड ग्रंथ...

 मी जेलमधे तुमच्या अवतीभवती पसरीन -

सगळीकडे आपले फोटो येतील !
 

आपल्याला कधी न भेटलेले,
 नातेवाईक भेटायला येतील .....
आणि नेहमी नको असणारे,

 अनायासे तोंड चुकवायला बघतील !

जा ना गडे एकदा तरी तुम्ही ...!
.

नव्हतीस घरी तू जेव्हां !


बऱ्याच वर्षांनी-
'माहेरपणा'साठी म्हणून बायको माहेरी गेली ;

तो नेपोलिअन का हिटलर का चर्चिल सांगून गेला होता -
'जगात अशक्य नावाची गोष्ट कुठेच नाही....!'
- अशा अर्थाचे काहीतरी,

 त्याने ते 'इंग्रजी'तच सांगितले असणार !
त्याला कुठले आपल्या 'माय मराठी'चे वेड असणार ?

मनांत म्हटलं -
चला, अशक्य ते आपणही आज करून टाकावे -
स्वहस्ते घरीच जेवण बनवावे !
( स्वैपाक करावा -असे म्हणणे कसे तरीच वाटते ना ? )

कुकर शोधला
त्यातले तीन डबडे शोधले
एकात वरणासाठी डाळ पाणी
दुसऱ्यात भातासाठी तांदूळ पाणी
तिसऱ्यात भाजीसाठी बटाटे पाणी
ओतले -

मनांत म्हटले - स्वैपाक स्वैपाक म्हणजे आता रोज
आपल्या दोन्ही हातची गोष्ट !
हाय काय अन् नाय काय ......

तिन्ही डबडे एकात एक वेवस्थित कुकरमध्ये झाकण फिरवून-
ग्यासच्या शेगडीवर कुकर ठेवला.....
आणि मी माझ्या नेहमीच्या लेखनकर्तव्याकडे वळलो .

कुकरच्या तीन शिट्ट्या ऐकू येईपर्यंत निवांत ...........!

अहो, एक तास होऊन गेला तरी-
बायकांना आपल्याकडे खेचणारा,
तो रंगीला कुकर शिट्टी मारतच नव्हता .
 

म्हटलं,
बायकोच्या कधीतरी अंगात येत असते,
तसे आज ह्या बेट्याच्या अंगात आलेले दिसते !

शेवटी मीच स्वत:शी शिट्टी वाजवत,
कुकरजवळ गेलो.......
आणि लक्षात आले -

लेखनकर्तव्याच्या गडबडीत,
मी ग्यास पेटवलाच नव्हता ना !

बायकोच्या आठवणीने . .

 दोन टिपे गळली राव डोळ्यांतून . .
 आपोआपच  !
.

३६ गुण -


आळस झटकण्याचा दिवस..
रविवारचा दिवस...
प्रसन्न दिवस...!


कपाटाची साफसफाई करायची ठरवली..
कपाटातून दोन कागद खाली पडलेले दिसले...
 

बायकोची आणि माझी कुंडली -
 

तेव्हां,
आमच्या दोघात तब्बल ३६ गुण जमले होते म्हणे !
प्रत्यक्षात,

 ३६ चा आकडा अजूनही डोकावत आहेच !

मला चहा,

 तर तिला कॉफी-
मला भजी,

 तर तिला शिरा-
मला गरम,

 तर तिला थंडगार-
मला तिची सासू,

 तर तिला माझी सासू-
मला जागणे,

 तर तिला घोरणे-

एक गोष्ट ...

 दोघांची जमत असेल,
 तर शपथ !

मी तर या निष्कर्षाला आलो आहे की,
पत्रिकेतले छत्तीस गुण जमवण्यापेक्षा,
 वधूवरांच्या

 छत्तीस आवडीनिवडीच्या गोष्टी 
तपासल्या तर,
जगातली ९९ टक्के लग्ने,
 शंभर टक्के यशस्वी होतील !
 

.

निद्रानाशासाठी जालीम उपाय ..


रात्रीचे अकरा वाजत आले होते. 
शेजारच्या वैनी बारीक आवाजात,
 बायकोशी काहीतरी खुसुफुसू करून गेल्या. 

त्या  गेल्यावर,
 मी बायकोला विचारले -
"काय ग ,
शेजारच्या वैनी कशाला आल्या होत्या ? "

उत्साहाने बायको उत्तरली -
" अहो, झोपेच्या गोळ्या संपल्याची आठवण,
अचानक आत्ता झाली त्यांना ! "

मी विचारले -
" अग पण....आपल्याकडे कुठे आहेत गोळ्या ? "

बायको सांगू लागली -
" आपल्याकडे नाहीतच हो  ...,
म्हणून तर मी त्यांना,
तुमची ती चारोळ्या/कवितांची वही दिलीय ! "


.

दोनच मिनिट हं -


घरोघरी ---------

स्वैपाकघरातून बायको जवळ जवळ ओरडतच आली -
" बाई बाई बाई !
अहो, दोन तास होऊन गेले ना ?
तुम्ही तर दोनच मिनिटात बंद करतो म्हणाला होतात..
तो मेला संगणक !
कम्माल झाली आता मात्र तुमची ..!
चहाचा कप गार पडलाय ...
अजूनही तसाच भरलेला आहे !
आंघोळीची बादली गारढोण होऊन गेलीय -
त्या गरम उपीटाची वाट लागलीय.
आटपा जरा लौकर -
आता तासाभरात जेवणाची वेळ होत आलीय ...!"

संगणकाकडे नजर ठेवतच,
मी शांतपणे उत्तरलो-
" दोनच मिनिट हं .. .. झाल माझ ! "
.

लक्ष्य.. लक्ष्य... लक्ष्य !


परवा एका जत्रेत बायकोबरोबर हिंडत असतांना,
 समोर एका पडद्यावर,
 तीसचाळीस रंगीबेरंगी फुगे आकर्षकरीत्या लटकवलेले दिसले .....

 बायकोने कधी नव्हे ते-
 हट्टाने,
बंदुकीने फुगे फोडायचे ठरवले.


मला '"स्त्रीहट्ट'" पुरवणे भागच !
 

बायको बंदूक हातात घेऊन सज्ज झाली !

पण,
 बायकोचा नेम एकदा..दोनदा..नाही, तर -
 तब्बल  बारा..तेरा वेळाही चुकलाच  !

बायको हिरमुसली ना !

मला तिचा चेहरा पाहवेना ...
मी तिच्या कानात एक गंमत सांगितली -

बायको जरा लाजली, हसली......
पण पुन्हा उत्साहाने तयार झाली .

[मी बायकोला सांगितले होते -
" तो फुगा म्हणजे माझी पाठ आहे असे समज -
आणि बंदुकीची गोळी.... म्हणजे तुझ्या हातातले लाटणे !
हं ...मार आता गोळ्या ! "]

अहो आश्चर्यम् !
बायकोने ओळीने...

अठरा-एकोणीस फुगे एकापाठोपाठ एक,
 फटाफट फोडले की हो !
.

आम्ही हे असेच राहू...!


स्तुती करणे जमणार नाही ,
यथेच्छ टवाळी करीत राहू ..

मदत कुणाला करणार नाही ,
करणाऱ्याला आडवे जाऊ ..

पुढे जाणारा बघवणार नाही ,
त्याला मागे ओढत राहू..

चांगला शेजारी होणार नाही ,
निंदक म्हणून आघाडीवर राहू...

कौतुक कधी न करणार कुणाचे ,
सदैव द्वेष करत राहू....
 
आमचा असा मराठी बाणा
नेहमी नुसता गर्जत राहू...!
 
.

नाचते नार तोऱ्यात -


नाचते नार तोऱ्यात फार नखऱ्यात माळुनी गजरा      
चाळ ते पायी तालात छान डौलात खिळवती नजरा

ओठिचे हास्य मधुजाल गाल ते लाल भान हुरहुरते  
होउनी दंग चोळीत तंग वेडात ध्यान भिरभिरते

हातची काकणे नाद घालुनी साद दावती मेंदी
ती अदा करतसे फिदा विसरुनी क्षुधा वाढती धुंदी

चमकती नयन सोडुनी तीर हृदयात थेट ते त्यांच्या   
मेखला खास झुलवून हात अदबीन हाति ये त्यांच्या

भिंगरी गरगरा फिरत राही भरभरा सावजा पाठी
रंगता महल रंगात येतसे शीळ कुठुनशी ओठी 

पापी  ते पोट बोटात नोट थाटात ओढ गाठीची 
थिरकतो ताल दावी कमाल ती नार नजर भेटीची  
.  

वसंत ऋतू आला -



सकाळी तू ओले केस 
फटकारत असताना 
आरसाच दिमाखात असतो 

पुडीतून हळूच डोकावणारा 
मोगरा प्रसन्न हसत असतो 
स्वत:शीच मान डोलावत 

खिडकीतून डोकावणारी अबोली 
काहीतरी पुटपुटत असते 
मनातल्या मनांत छानसे 

मिठी मारल्यागत 
लाजाळू तुझी पाठ पहात 
खुदकन लाजलेले असते 

आरशासमोर दोन गुलाब 
उमलत चाललेले 
मला दुरूनही दिसतात 

ओठावरचे निसर्गदत्त 
डाळिंबाचे दाणे पिळवटून
ओठावर पसरायला पहातात 

दोन भुवयांच्या कमानीत 
जास्वन्दीचा लालभडक ठिपका 
विराजमान होत असतो 

पावडरच्या कणाकणात 
जाईजुईचा मंद सुगंध 
अहाहा, चेहऱ्यावर पसरतो 

हिरव्या साडीचोळीतले 
अनोखे रूप 
मनाची घालमेल वाढवते 

माझ्या कवितेतला वसंत 
बहरलेला असतो
उन्मुक्तपणे जगापुढे !

.

पोरी....!!!


पोरी...!

जपून टाक पाऊल पूर्ण -

तुझ्या स्वप्नातले जग आणि स्वप्नाच्या पलीकडचे जग 

जमीन अस्मानाचे अंतर आहे.... दोन्हीत !

स्वप्नात येत असेल तुझ्या एकच आवडता राजकुमार 
तुझ्या आवडत्या गुलाबी आयाळीच्या घोड्यावर बसून हसत हसत ..

स्वप्नाबाहेरच्या जगात मात्र राजकुमाराच्या वेशातले
दैत्य येतील 
भेटतील 
गोड गोड बोलतील

तू जाळ्यात सापडो अगर न सापडो... 

संधी मिळताच,
आपले खरे दैत्याचे 
हिंस्र रूप दाखवत 
दाताड विचकत
अचकट विचकत वाकुल्या दाखवत 
तुटून पडतील ..! 

कुणालाही तू बोलवू शकणार नाहीस 
कुणी तुझे आर्त हृदय पिळवटणारे आक्रंदन ऐकण्यास 
समोर आसपास असले,
कुणीही तरी येणार नाही
सगळे धृतराष्ट्र असणार 
आता कौरवांचे वंशज जिवंत आहेत
संधीसाधू दु:शासन दुर्योधन अस्तित्वात आहेत 

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला 
आपली मुलगी मानणारा एकच शिवाजी होता 
इथे आता पदोपदी मावळे नाहीत 
डोमकावळे जागोजागी टपलेले आहेत 
आपल्या मुलीवर वाईट नजर ठेवणारे आहेत 
नात्यागोत्याना वेळप्रसंगी झुगारून देणारे आहेत 

कृष्ण पुन्हा धावा केल्यावर येईल,
ह्या भ्रमात राहू नकोस !

तुझे तुलाच रणरागिणी बनायचे आहे 
तुझे तुलाच रक्षण करायचे आहे 
तुझे नशीब तुझे तुलाच घडवायचे आहे 
तुझ्यातली हिम्मत 
तुझे सामर्थ्य 
तुझी आत्मसन्मानाची ओळख 
तू पटवण्यास सशक्त आहेस 
हे तूच दाखवून द्यायचे आहेस 

जग फार भोंदू असल्याचे दाखवील 
भोळेभाबडे असल्याचा आव आणील 

पण ....
लक्षात ठेव 
तू अबला नाहीस- सबला होऊ शकतेस 
मनाची पारख करून ठेव 
तुला काहीही अशक्य नाही 
याची जाणीव सतत मनाशी ठेव 

पुढचे तुझे पाऊल ...
तुझ्या विजयाची नांदी असेल !
.